मुंबई : “ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे” अशा शब्दात भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर निशाणा साधला.
“राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरुवात असून पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?” असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला.
“निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.” असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला.
“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरूवात“
“जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे” असा इशारा महाजनांनी दिला.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नाही. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याचा सन्मान ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे. सीबीआय चौकशीदरम्यान पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी पक्षासमोर मांडली.