असेल हिंमत तर सिद्ध करा भ्रष्टाचार; रोहिणी खडसे यांचं भाजप आमदाराला आव्हान

0

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर तोडपाणी व भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे आमदार राम सातपुते यांना राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी खडसेंवर ट्वीटरवरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावर खडसे यांच्या कन्या रोहिणी यांनी ‘नाथाभाऊ पैसे खात होते तर सत्ता असताना तुम्ही कारवाई का केली नाही? तुम्ही काय नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?’ अशा शब्दांत ट्वीटरवरूनच सातपुते यांना लक्ष केले आहे. त्यानंतर सातपुते यांनीही रोहिणी खडसे यांच्या ट्वीटला, ‘ताई बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जायगी’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. खडसे यांना संधी मिळताच ते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत असतात. अलीकडेच खडसे यांनी ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ असा टोला हाणला होता. त्यांच्या टीकेला भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिलं होतं. ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊंबद्दल बोलतात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा, सगळं लक्षात येईल’ असं सातपुते म्हणाले होते.

खडसेंवर सातपुते यांनी केलेल्या या आरोपांना रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरूनच खणखणीत उत्तर दिलं. ‘अहो, नाथाभाऊ पैसे खात होते, तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?’ असंही रोहिणी खडसे यांनी सातपुतेंना सुनावलं.

Leave A Reply

Your email address will not be published.