बुलडाणा : वनविभागाअंतर्गत जळगांव जामोद वनपरिक्षेत्रात दि. 12 एप्रिल 2021 रोजी सकाळी अंदाजे 5 वाजता निमखेडी बिट वनखंड 371 मध्ये भिंगारा ते निमखेडी मार्गावर रात्रगस्त करीत असतांना चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार क्रमांक एम एच – 20 बी सी 397 दिसून आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने गाडी जंगलात सोडून पळ काढला. आरोपीची वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपी तेजराज अशोक लोणी जळगांव जामोद येथील राहणार असल्याची खात्री केली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) जळगांव जामोद यांनी नमूद केले आहे.
सदर आरोपीने टाटा इंडिगो गाडी व भ्रमणध्वनी सोडून पळ काढला आहे. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या सालई गोंद व 8 कट्टे आढळून आले सदर गोंद मालाचे पंचनामा करुन वजन केले असता 265 कि. लो. भरले. याबाबत वनगुन्हा क्र. 665/16601 दि 12 एप्रिल 2021 अन्वये जारी करण्यात आला आहे. तसेच सदर माल व वाहन, भ्रमणध्वनी जप्त करुन लाकुड जळगांव जामोद आगारात ठेवण्यात आले आहे.
सदर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) जळगाव जामोद व वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत. आरोपी विरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 ड, फ, ग, 41, 42, 52,61 ए,69 महाराष्ट्र वननियमावली नियम 2014 चे नियम 31,82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया, जळगांव जामोद, वनपाल पी. जी. सानप, वनरक्षक ए. आर. खेडकर, आर. व्हि. फड, बी. एम. खेडकर, वनविभागाचे कर्मचारी यांनी वरील प्रमाणे कारवाई केली आहे. तसेच अवैध सालई गोंद, अवैध वाहतुक,शिकार तस्करी, वृक्षतोड ची तक्रार बाबत माहिती असल्यास वनविभागास कळविण्याचे आवाहन उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.