जळगाव: लग्न पहावे करुन असे म्हणतात. अलीकडे तर विवाह सोहळ्यांना इव्हेन्टचा लूकही दिला जातो. प्रतिष्ठेचा बडेजाव करताना लाखो रुपये खर्च केले जातात. या सर्व बडेजावाला फाटा देत अवघ्या एक रूपयात आठ जोडप्यांचे शुभमंगल शहरातील सागर पार्क मैदानावर मराठा उद्योजक विकास मंडळ व अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने शुभ मंगलम विवाह पार पडला. यावेळी नवदाम्पत्यांना समाज बांधवांकडून संसारोपयोगी भेट वस्तू देण्यात आल्या.
वधू-वरास आशिर्वाद देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे आदी उपस्थित होते. मंडळातफे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथील समाज मंडळांना उत्कृष्ट समाज कार्याबद्दल सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. समाजात उत्कृष्ट कार्य करणार्या 10 समाजबांधवांना मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
या सोहळ्यात माधुरी कदम-सागर शेलार, पूनम वायकर-वसंत आभाळे, मानसी माळतकर-राहुल इंगळे, आरती लंके-नीलेश गुंजाळ, निकिता शेट्ये-भागवत गायकवाड, योगिता शिंदे-राजेंद्र साळुंके, उज्ज्वला आवटे-अनिल शेळके, दीपाली सुर्यवंशी-मनोहर जाधव या आठ जोडप्यांचा विवाह झाला.