झारखंड येथील चतरा जिल्ह्यातील घटना
नवी दिल्ली ;- नवी दिल्ली – बलात्काराच्या घटनांनी गेल्या काही दिवसांपासून देश हादरलेला असतानाच झारखंड येथील चतरा या जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. गावातील पंचांनी पीडित मुलीसोबत काय झाले आहे हे समजताच या घटनेतील दोषींना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला. हे नराधम दंड ठोठावल्याचा राग मनात धरून पीडित मुलीच्या घरी गेले. तिथे तिच्या घरात बळजबरीने घुसले आणि तिला जाळून ठार केले.
पीडित मुलगी ८ वीत शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना छतरा या ठिकाणच्या राजा केंदुआ गावात घडली. पण जो दंड या सगळ्या घटनेनंतर ठोठावण्यात आला त्याचा राग मनात ठेवून या नराधमांनी या मुलीच्या घरात घुसून तिला जिवंत जाळले. तसेच तिच्या आई वडिलांनाही मारहाण केली. आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी पीडित मुलगी गेली होती. तिथून परतत असताना तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास ही मुलगी रडत घरी आली आणि तिने आपल्या आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला.
नराधमांना अटक
पंचायतीत पीडित मुलीच्या आई वडिलांनी दाद मागितली. पंचांनी शुक्रवारी पंचायत बोलावली आणि सगळ्या नराधमांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला. या नराधमांनी हाच राग मनात धरून पीडित मुलीला जिवंत जाळले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले. पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर नराधमांना अटक करण्यात आली आहे.