मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदी यांच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा विचार करत आहे.
हवाईमार्गाने आयात केलेल्या सोन्यावर महाराष्ट्र सरकार 0.1 टक्के मुद्रांक शुल्क सध्या आकारत आहे. इतर राज्यांमध्ये हे शुल्क नसल्याने इतर राज्यांमध्ये सोन्याची आयात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सोने आयातीच्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्य सरकारने हा कर कमी केला तर सोन्याच्या आयातीत दुपटीने म्हणजे दोन हजार टन इतकी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई या मार्गाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सोन्याची आयात वाढेल आणि असे झाले तर महाराष्ट्र सरकारचा जीएसटी कर मोठ्या प्रमाणात वाढेल आणि राज्याचे अर्थचक्र सुधारेल. त्याचा सर्वांगीण विकासावर थेट परिणाम होणार आहे.
सध्या दिल्लीतून सोन्याची आयात होत असल्याने त्या ठिकाणाहून देशातील इतर राज्यांमध्ये सोन्याचे वितरण केले जाते. त्या ठिकाणाहून सोनं महाराष्ट्रात आणताना त्याचा जो वाहतूक खर्च लागतो हा ग्राहकांच्या खिशावर टाकला जातो.
मुद्रांक शुल्क सरकारने माफ केले तर सोन्याची आयात दिल्ली ऐवजी मुंबईमध्येच होईल आणि राज्य सरकारला जीएसटी चे उत्पन्न तर मिळेलच पण याशिवाय व्यापाऱ्यांना देखील कमी खर्च लागणार आहे. याचा परिणाम म्हणून ग्राहकांना अंदाजे किमान पाचशे रुपये प्रति तोळा एवढा दर कमी होणार आहे.