Monday, September 26, 2022

अरुण पाटलांचा गेम करण्यामागचे षढयंत्र!

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलला निर्विवाद सत्ता मिळाली. या निवडणुकीत रावेर तालुका विकासो मतदार संघातील निवडणूक निकालाने आश्चर्याचा धक्का दिला. राजकारण किती खालच्या थराला गेलेले आहे. राजकारण्यांची विश्वासार्हता संपलेली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.

- Advertisement -

जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हभरातील सर्वच मतदार संघातून भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली. रावेर विकासो मतदार संघातून भाजपतर्फे उमेदवारी दाखल केलेले नंदु महाजन यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर रावेर विकासो मतदार संघातून माजी आमदार राष्ट्रवादीचे अरुण पाटील यांचा अपक्ष म्हणून तसेच महाविकास आघाडी सहकार पॅनेलतर्फे काँग्रेसच्या जनाबाई गोंडू महाजन आणि काँग्रेसचे राजीव रघुनाथ पाटील यांचा अपक्ष म्हणून असे तीन उमेदवार रिंगणात होते. या तिघात ही निवडणूक होणार होती.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन यांनी आपण आपली उमेदवारी मागे घेऊन त्यांचा जाहीर पाठिंबा अरुण पाटलांना असल्याचे जाहीरात देऊन जाहीर केले होते. म्हणजे अरुण पाटील आणि राजीव रघुनाथ पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार होती. परंतु राजीव रघुनाथ पाटील यांनीही मतदानाच्या आधी काही दिवस पत्रकार परिषद घेऊन अरुण पाटलांना जाहीर पाठिंबा दिला होता. या पत्रकार परिषदेला खुद्द अरुण पाटील आणि बँकेचे संचालक संजय पवार हे उपस्थित होते. त्या पत्रकार परिषदेत राजीव रघुनाथ पाटील यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रावेरचे काँग्रेस आमदार शिरीषदादा चौधरी तसेच जिल्हा काँग्रेस श्रेष्ठींवर आरोप करून निष्ठावान काँग्रेसला डावलून जे काँग्रेसमध्ये नव्हते त्यांना उमेदवारी दिली असा आरोप केला होता.

जिल्हा काँग्रेस श्रेष्ठींवर राजीव रघुनाथ पाटील यांनी केलेल्या आरोपाद्दल लिहियाचे तर तो स्वतंत्र विषय होऊ शकतो. परंतु जनाबाई महाजन आणि राजीव रघुनाथ पाटील यांनी पाठिंबा दिल्यानंतर अरुण पाटलांची निवड जवळ जवळ बिनविरोध निश्चित होती. दरम्यान अरुण पाटलांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांना भेटले. त्यानंतर अरुण पाटील हे भाजप पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहीर झाले. इथेच अरुण पाटलांचा पहिला गेम झाला. दोन उमेदवारांनी पाठिंबा दिला असतांना अरुण पाटलांना भाजप पुरस्कृतपणाची गरजच नव्हती.

भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर झाल्याने अरुण पाटलांच्या उमेदवारीविषयी घरघर सुरू झाली. गिरीश महाजनांचे कट्टर शत्रू एकनाथराव खडसेंनी कंबर कसली. रावेरचे काँग्रेस आमदार शिरीषदादा चौधरी यांची भेट घेऊन अरुण पाटलांना जाहीर पाठिंबा दिलेल्या जनाबाई गोंडू महाजन यांच्याशी भेटी गाठी घेऊन निवडणुक प्रचारात मतदारांना भेटून मते मागायला सुरूवात झाली. प्रचारात रंगत आली. अरुण पाटील हेही भाजपच्या मदतीने प्रचारात चुरस निर्माण केली. परंतु रावेर तालुका विकासोमध्ये असलेल्या एकूण 54 मतदानांपैकी जनाबाई महाजन यांना 26 तर अरुण पाटलांना 25 मते पडली. अरुण पाटलांचा एक मताने पराभव होऊन त्यांचा राजकीय गेम झाला.

रावेर विकासो मतदार संघातील निवडणुकीवर आणि जाहीर पाठिंबा देऊन पुन्हा मैदानात उतरून निवडणूक लढविण्याचा प्रकार पहाता राजकारण्यांची विश्वासार्हता ऐरणीवर आली आहे. माजी आमदार अरुण पाटील हे मूळचे भाजपाचेच. एकनाथराव खडसेंमुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढविली हे राष्ट्रवादीच्या खडसेंना आवडले नाही. त्यानंतर ते भाजपचे गिरीश महाजन यांना भेटून भाजप पुरस्कृत झाली. ही अरुण पाटलांची चूक झाली. एकनाथराव खडसे इरेला पेटले. त्यांना भाजपचा उमेदवार बॅकेत संचालक होता कामा नये, असा चंग बांधला. त्यातून सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडू महाजन यांना निवडणूक प्रचारात उतरवले. जे काही सहकार्य करायचे सहकार्य केले. संपूर्ण ताकद महाविकास आघाडीची जनाबाईच्या पाठीशी उभी केली. 54 मतदार असलेल्या रावेर विकासो मतदार संघात एक एक मत मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली. त्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली.

जनाबाई महाजनांचा एक मताने विजय झाला. माजी आमदार अरुण पाटलांच्या पदरी नामुष्की आली. तसेच अरुण पाटलांची उमेदवारी पुरस्कृत करणाऱ्या भाजपची विशेषत्वाने गिरीश महाजनांची नाचक्की झाली. त्याचबरोबर भाजपचा आदेश डावलून बंडखोरी करुन भुसावळ विकासोमधून भाजपचे आमदारांनी नामुष्की ओढवली. आ. संजय सावकारे यांनी जिल्हा बँकेत अपक्ष उमेदवारी लढविली आणि त्यांचा विजय झाला. तो एकनाथराव खडसे यांच्या सहकार्यामुळेच हे सर्वत्र चर्चिले जातेय. परंतु या सर्व राजकीय डावपेचात अरुण पाटील यांच्यासारख्या सात्विक व्यक्तीमत्वाचा बळी गेला एवढे मात्र निश्चित. त्यांनी ही निवडणूकच लढवायला नको होती असे अनेकांचे मत पडले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या