नवी दिल्ली :- रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावली झाली. दरम्यान, यावेळी प्रगती अहवाल येत्या आठवडाभरात सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थता समितीला दिले. मध्यस्थांच्या समितीने अहवाल देण्याची १८ जुलैपर्यंत वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी घेऊ असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मध्यस्थ समिती काहीच काम करत नाही. त्यामुळे अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर मध्यस्थांना कोर्टाने वेळ दिला आहे. त्यांचा अहवाल येण्यास अजून वेळ आहे, असं स्पष्ट करतानाच कोर्टाने येत्या गुरुवारपर्यंत मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. येत्या १८ जुलै रोजी मध्यस्थांचा अहवाल आल्यानंतर मध्यस्थ समिती सुरू ठेवायची की नाही यावर कोर्टात फैसला होणार आहे. शिवाय मध्यस्थ समितीकडून हा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नसले तर येत्या २५ जुलै पासून अयोध्या प्रकरणावर ओपन कोर्टात रोज सुनावणी होणार आहे.