पारोळा प्रतिनिधी : एरंडोल — पारोळा विधानसभा मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यात २९ मे रोजी झालेल्या सुसाट्याचा वादळासह मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा शेतात उभे असलेली पिके जमीन दोस्त झाली. त्यामुळे याचा चांगलाच मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
त्यामुळे बळीराजाला धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, त्या सोबतच राज्यासह संपूर्ण विश्वात कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहेत. या सर्व कोरोना भयावह परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवांतील दुकानदारांना सकाळी ७ ते ११ यावेळेत आपली दुकाने सुरु ठेवण्याचे निर्बंध लावलेले आहेत. परंतु यावेळेत दुकानदारांचा व ग्राहकांचा काही समतोल बसत नाही.
त्यामुळे यावेळेत अंशतः बदल करून सकाळी ७ ते ११ ऐवजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करून पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थिती, नागरी समस्या, शेतकऱ्यांचा समस्यांबाबत पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तथा जळगांव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत साहेब यांच्याशी चर्चा केली आहे.