वॉशिंग्टन : जगाला हतबल करून सोडणाऱ्या करोना विषाणूमुळे चीनविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा झटका दिला आहे. कारण अमेरिकेने चिनी ऍप टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क असलेल्या कंपनीसोबत कोणताही व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट अंतर्गत या आदेशाला मंजुरी दिली. बाईट डान्स या कंपनीकडे टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क आहेत. या आदेशानंतर नंतर अमेरिकेत टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी येणार आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी संध्याकाळी चिनी ऍप टिकटॉक आणि वीचॅटला 45 दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याआधी अमेरिकन कर्मचाऱ्यांनी टिकटॉक न वापरण्याच्या आदेशाला सीनेटने एकमताने परवानगी दिली होती. बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, ही बंदी आवश्यक आहे, कारण ‘अविश्वासार्ह’ ऍप जसे की टिकटॉकमधून डेटा एकत्र करणं हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.”