पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतुकीसाठी तयार केला मार्गदर्शक प्रस्ताव : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अमळनेर, दि.5 –
पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणे अधिक सोयीस्कर व कमी खर्चाचे करण्याचा 500 पानांचा प्रस्ताव फक्त 40 पानांमध्ये करून शासनाला मदत करणारी अमळनेरच्या पल्लवी देशपांडेच्या पुस्तकाचे केंद्र सरकारने प्रकाशन करून कौतुक केले आहे.
पल्लवी हिने पुण्यातील नामवंत फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने राज्यशास्त्र या विषयात बी ए पूर्ण केले. फर्गुसनमध्ये तिने या विषयात प्रथम क्रमांक मिळवला. एम ए करण्यासाठी ती बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात गेली.
एम ए प्रथम वर्षात तिने पुणे येथील दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डीआयसीसीआय) येथे इंटर्नशिप करत असताना भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या एलपीजी वाहतूक वितरण प्रणाली या योजनेचा अभ्यास केला. यामध्ये असणार्या जाचक अटी काढून टाकून हि योजना कशी सर्वसमावेशक बनावता येईल यावर एक नवीन पॉलिसी बनवणार्या टीम मध्ये तिने काम केले. या टीमच्या सर्व सूचना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून मान्य करण्यात आल्या. हे करत असतानाच तिच्या लक्षात आले कि शासनाच्या अशा अनेक योजना फार कठीण शब्दांत मांडलेल्या असून त्या सामान्य माणसापर्यंत पोहचण्यात अनेक अडचणी येतात. हा प्राथमिक विचार डोक्यात ठेऊन तिने या योजनेशी निगडित सगळी माहिती गोळा करून, त्यावर 2 महिने संशोधन करून एक पुस्तिका बनवली ज्यात या योजनेला अधिक सोप्या पद्धतीने तिने मांडले आहे. एकूण 500 पानांच्या या योजनेला तिने फक्त 40 पानांत समाविष्ट केले आहे. यासाठी तिने विविध इन्फो-ग्राफिक्स ची मदत घेतली आहे.
एल पी जी वितरण प्रणाली कशी सर्वांसाठी खुली करण्यात येईल याबद्दल देखील या पुस्तिकेत सविस्तर माहिती आहे. तिच्या या पुस्तिकेचे स्वरूप डी आय सी सी आय चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे याना अतिशय आवडल्याने त्यांनी भोपाळ, हैदराबाद अशा विविध ठिकाणच्या मंत्र्यांसमोर तिचे प्रेसेंटेशन्स ठेवले.
30 ऑगस्ट 2018, भुवनेश्वर येथे या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेचे प्रकाशन मा. धर्मेंद्र प्रधान (पेट्रोलियम मिनिस्टर), मा. गिरीराज सिंग (सूक्ष्म, मघू, मध्यम उद्योग मिनिस्टर) व मा. जुएल ओराम (मिनिस्टर, आदिवासी मंत्रालय) भारत सरकार अशा महत्वपूर्ण केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
कु. पल्लवी देशपांडे अमळनेर येथील सायली देशपांडे (शिक्षिका, लोकमान्य विद्यालय) व उदय देशपांडे यांची कन्या आहे.