अमरावतीला जिल्हा वार्षिक योजनेसाठी 300 कोटी ; उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावति जिल्हा वार्षिक योजनेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी ३०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.8 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय झाला.

अमरावती येथील नियोजन समितीच्या सभागृहात सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोलाचे पालकमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू, नियोजनचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह, तसेच अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध नियोजित कामांबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यातील कामांची आवश्यकता लक्षात घेऊन नियोजनासाठीचा निधी २८५ कोटी रूपयांवरून ३०० कोटी रूपयांपर्यंत वाढवून मिळण्याची मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर व विविध लोकप्रतिनिधींनी केली, त्याला मान्यता देत उपमुख्यमंत्री महोदयांनी ३०० कोटी रूपयांच्या तरतुदीला मान्यता दिली.

कोरोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. तरीही जिल्हा नियोजनचा पूर्ण निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच आमदार निधीत कोणतीही कपात केलेली नाही. कोरोनाचा काळ, विधान परिषद आणि ग्रामपंचायत निवडणूक यामुळे निधी खर्च होण्यासाठी निविदा कालावधी कमी करून देण्यात आला आहे. त्यामुळे विभागांनी उपलब्ध निधी तातडीने खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासोबतच जिल्हा नियोजनच्या कार्यकारी समिती आणि उपसमिती स्थापन करून त्याचे प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री यावेळी दिले. वन कायद्याचा मेळघाटातील विकास कामावर होणारा परिणाम याबाबत निर्णय घेणार. परवानगी मुख्य वनसंरक्षक स्तरावर करण्याचा विचार आहे. विभागीय आयुक्त आणि सचिव यांच्यासह बैठक घेऊन प्रश्न सोडवू. खारपाणपट्ट्याची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वतंत्र धोरण आणणार, असेही ते म्हणाले.

अमरावतीत गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज होणारच  !!

राज्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करताना विभागाच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार अमरावतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या काळात स्थापन होणारच आहे. त्याबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये. त्यासोबतच अमरावतीत बेलोरा विमानतळ येथे धावपट्टीचा विकास व इतर सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 80 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अमरावति जिल्ह्यात होणार ही वैशिष्ट्यपूर्ण कामे !!

अमरावति  जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनतून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण, पांदणरस्त्यांसाठी विशेष मॉडेल, ‘माझी वसुंधरा’मध्ये सौर ऊर्जा यंत्रणा, आमझरी येथे ‘मँगो व्हिलेज’, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता ‘इनलँड वॉटर टुरिझम’वर हभर देण्यात येईल. जिल्ह्यात गारमेंट हब निर्माण करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.