नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्याला गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यातच त्यानं भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती.
सनी देओल म्हणाला की, देशाला नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची गरज आहे. ‘नरेंद्र मोदींनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे. माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपासोबत जोडले गेले आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपासोबत जोडलो गेलो आहे’ असे सनी देओल यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा व सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांना पंजाबमधून भाजपातर्फे लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे.