स्टॉकहोम : अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या संशोधकांच्या संशोधनामुळे जागतिक दारीद्रयाविरोधातील लढ्यास बळ मिळाले आहे. त्यांच्या प्रयोगशील दृष्टीकोनामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी आली. ती आता संशोधनात परावर्तीत झाली, असे नोबेलच्या समितीने निवेदनात म्हटले आहे.
बॅनर्जी (वय 58) यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हार्वड विद्यापीठात झाले. तेथे त्यांनी पी.एचडी. मिळवली. मॅस्साचेटस इस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ते फोर्ड फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय प्राध्यापक आहेत. बॅनर्जी यांनी डफ्लो यांच्यासह अन्दुल लतीफ कमील पॉव्हर्टी ऍक्शन लॅबची स्थापना केली.