का ? महागणार सुकामेवा..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी विजय झाल्यामुळे जल्लोष करत आहेत.  दुसरीकडे अफगानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून  गेल्या दोन दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा भारतातील व्यापारावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील सुक्या मेव्याचे दर वेगाने वाढत आहेत. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या घडामोडींमुळे  ड्राय फ्रूट्सची आयात विस्कळीत झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये ड्राय फ्रूट्सचे दर खूप वाढले आहेत. त्याचबरोबर  सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत.

गेल्या वर्षापासून अफगाणिस्तानातून ड्राय फ्रूट्सच्या आयातीत वाढ झाली होती. अफगाणिस्तातून भारतात येणाऱ्या निर्यातीमध्ये ९९ टक्के वाटा कृषी आणि संबंधित उत्पादनांचा आहे. परंतु आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानातील सत्ता तालिबानने काबीज केले आहे. यामुळे आता भारत आणि अफगाणिस्तानातील व्यापारी संबंधांवर परिणाम होऊ शकतो. भारतासाठी अफगाणिस्तान ड्राय फ्रूट्ससाठीचा एक मोठा स्रोत आहे. पण सध्या ड्राय फ्रूट्सची आयात होत नसल्यामुळे त्यामुळे येत्या दिवाळीत अडचणीला सामोर जावे लागणार आहे.

अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो. साधारण: ऑगस्टअखेर, सप्टेंबरमध्ये नवे पीक हाती येते. त्यावेळी भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची खरेदी होते. मात्र, सध्या अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सणासुदीच्या दिवसांत सुकामेवा आणि त्यापासून बनवलेल्या मिठायांना भारतात मोठी मागणी असते. मात्र, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास या कालावधीत किमती वाढण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमधून सुमारे ३८ हजार टन सुकामेव्याची भारतात आयात होते. गेल्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) भारताने ३७५३.४७ कोटींचा माल अफगाणिस्तानातून आयात केला. त्यापैकी २३८९ कोटी रुपये सुकामेव्यासाठी होते.

तसेच स्वयंपाकात वापरण्यात येणारे हिंग तयार करण्यासाठीचे मूळ साहित्य आणि शहाजिरे याचाही पुरवठा अफगाणिस्तानातून होतो. मात्र, त्याची मागणी आणि वापर तुलनेने मर्यादित असतो. मात्र, या पदार्थांचा पुरवठा आणि किमतींवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे देखील चित्र समोर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.