जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे रांजणी हे गाव असून १०० टक्के अपंगत्व असलेल्या व आपल्या वृद्ध आई विना कुठलाही आधार नसलेल्या ४२ वर्षीय सुपडाबाई रामा मगरे या निराधार महिला गेल्या अनेक वर्षापासून विविध शासकीय योजनांच्या प्रतीक्षेत आहेत.
सुपडाबाई गावातील महावितरणच्या उपकेंद्राजवळ असलेल्या छपराच्या घरात आपल्या ६८ वर्षीय वृध्द आई सोबत राहतात.
सुपडाबाई ह्या १०० टक्के अपंग असून त्यांच्याकडे आधार कार्ड,मतदान कार्ड यांसह शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रे नसल्याने योजनांचा लाभ कसा मिळवावा ही त्यांची समस्या आहे.या कारणाने गेल्या अनेक वर्षांपासून त्या योजनांपासून वंचित असून निदान हक्काचे घर मिळावे अशी अपेक्षा त्यांना आहे.
या अपंग व निराधार माय – लेकीच्या परिस्थितीची माहिती कळताच गरिबांचे कैवारी म्हणून ओळख असलेले मा.मंत्री बच्चु कडू यांची प्रहार संघटना त्या महिलेच्या मदतीला धावून आली.प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून,त्यांना किराणा साहित्य देत रमाई घरकुल योजना,संजय गांधी निराधार योजना,ग्रामपंचायतीचा अपंगासाठी असलेला राखीव निधी मिळवून देण्यासाठी यापुढे संघटना सक्रिय राहील असे आश्वासन दिले .तर येथील सामाजिक कार्यकर्ते महेश अहिर यांनी वारंवार प्रशासनाकडे सुपडाबाई यांना मदत मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.