…अन मृत झालेली व्यक्ती चालत येते तेव्हा !

0

जळगाव : मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेऊन आंघोळीची तयारी करीत असताना त्याच वेळी समोरुन ती व्यक्ती चालत आल्याने एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुणालयातून आणलेला मृतदेह एकदा निरखून पाहिला. ही व्यक्ती ती नसल्याची खात्री पटल्यानंतर तो मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. ज्याची अंत्ययात्रा (जनाजा) निघत होती तोच व्यक्ती जेव्हा दारात उभा राहतो आणि मग कसा गोंधळ उडतो हे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ शहरातील मेहरुण भागातील नागरिकांवर दि.13 रोजी आली.

जिल्हा रुग्णालयाच्या भींतीजवळ शनिवारी सकाळी साडे दहा वाजता ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरिक्षक संदीप आराक व सुनील जोशी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. मृत व्यक्तीचे नातेवाईक मेहरुणमधील जोशी वाड्यात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस तेथे पोहचले.

अमीर शेख हा तरुण मृतदेह पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आला. मृत व्यक्ती माझे मामा असून त्यांचे नाव नाजीम शेख अहमद आहेत असे सांगून त्याने मृतदेह ओळखला. त्यामुळे ही घटना घरी कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कागदपत्रे बनवून मृतदेह या परिवाराच्या ताब्यात दिला. मृतदेह मेहरुणमधील जोशीवाड्यात नेण्यात आला. घरी नेवून अंत्यविधीचे (जनाजा) सोपस्कार सुरु असतांना त्याचवेळी मनोरुग्ण वासीम शेख अहमद हा समोर उभा ठाकला. वासीमला पाहून सारेच क्षणभर अवाक झाले. नाजीमच्या मृत्यूचे कागदपत्रे तयार झालीत मात्र तो जीवंत असल्याचे आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा पोलिसांना परत दिला. त्यांना समोरुन पाहून सर्वांनाच आश्चयार्चा धक्का बसला.

जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करताना पोलिसांनी मृत व्यक्ती म्हणून नाजीमचीच नोंद केली. नंतर ही व्यक्ती जीवंत असल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांचीही अडचण झाली. कागदपत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याने उशिरापर्यंत याच विषयावर मंथन सुरु होते तर नातेवाईकही जिल्हा पेठ पोलिसात थांबून होते. दरम्यान, नाजीम शेख यांची पत्नी व मुले सोडून गेल्याने २० वषार्पासून त्यांची मानसिकस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे ते सतत बाहेरच असतात, असे नातेवाईकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.