सोलापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या खुर्चीचा पाय तुटल्याने त्यांचा तोल गेला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
दरम्यान, यावेळी “आपणच निवडणूक जिंकलो अशा आविर्भावात शरद पवार आणि त्यांचे पुतणे प्रतिक्रिया देत आहेत. दिल्लीत यांच्या पक्षाला शून्य मतं आहेत. शेजारच्या मुलाला झाला म्हणून पेढे वाटण्यासारखं काम हे करत आहेत”, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
सोलापूर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील हे पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस केंद्रीय मंत्रीपदाचा कारभार स्वीकारणार आहेत अशी चर्चा सुरु आहे, यावर उत्तर देत असताना अचानक त्यांच्या खुर्चीचा पाय तुटला. त्यामुळे त्यांचा तोल गेला. यावेळी बाजूला उभे असललेले जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पाटील यांना आधार दिला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.