वरणगाव । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असताना देखील जिल्ह्यातील काही ठिकाणी लाभार्थ्यांना शासकीय धान्याचे वाटप होत नसल्याची तक्रार होत आहे. अशातच वरणगाव येथे लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानातून धान्य न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी यांना कळवल्यानंतर त्यांनी गांधी चौकातील पी.जी.चौधरी यांचे स्वस्त धान्य दुकान गाठत जाब विचारला.
याप्रसंगी अनेक नागरीकांनी यापूर्वी दुकानातून धान्य मिळत असल्याचे सांगत प्राधान्यक्रम यादीत नाव नसल्याने धान्य दिले जात नसल्याची तक्रार केली. यावेळी राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे व पुरवठा अधिकारी नागरगोजे यांच्याशी संपर्क साधून अडचण सांगितली. यावेळी स्थानिक तलाठी यांना चौकशीकामी पाठवल्यानंतर लाभार्थींना धान्य देण्यात आले शिवाय ज्या लाभार्थींना यापूर्वी धान्य मिळाले आहे मात्र त्यांची नावे आदी यादीत नाही, अशांची यादीदेखील तयार करण्याची सूचना करण्यात आली. दरम्यान, तालुका पुरवठा अधिकारी व तहसीलदार हे सर्व स्वस्त धान्य दुकानांना भेटी देणार असून शासनाच्या आदेशानंतरही नागरीकांना धान्य न देणार्या दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना देण्यात आले.