अनिल चौधरींसोबत ‘मै हू डॉन’ डान्स भोवले!

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

एखाद्या सभारंभाला चहाते, मित्रमंडळी त्यांचे हितचिंतक उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला तर त्या समारंभाची गरिमा वाढते. परंतु जळगाव शहर पोलिस ठाण्याचे सहा. फौजदार वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्त आयोजित सभारंभात मात्र विपरित घडले. सहा.फौजदार वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जळगाव शहरातील एका मॉलच्या सभागृहात जंगी पार्टी झाली. एक ऑगस्टच्या रात्री ही पार्टी झाल्यानंतर त्याचे दुसरे दिवशी त्या पार्टीत आनंदोत्सव साजरा झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ झपाट्याने सर्वत्र पसरला. या पार्टीमध्ये जळगाव शहरातील वासुदेव सोनवणे, चहाते, मित्र, हितचिंतक उपस्थित होते. त्याचबरोबर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हेही उपस्थित होते. पार्टी रंगात आली होती. आनंदोत्सव साजरा केला जात होता. चित्रपटाच्या गाण्यांवर नाचणे सुरू होते. त्यातच ‘मै हू डॉन’ या चित्रपटातील ओ शेठ हे गाणे सुरू झाले आणि भुसावळचे डॉन समजले जाणारे अनिल चौधरी यांचा डान्स सुरू झाला. त्यांचे समवेत उत्सवमूर्ती वासुदेव सोनवणे सह जळगाव शहर पोलिस स्टेशनमधील उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी डॉन अनिल चौधरीसोबत फेर धरला. ह्या व्हिडिओने वासुदेव सोनवणेंच्या पार्टीवर विरजणच पडले.

पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे हे मुंबईला असतांना मुंबईहून त्यांनी संबंधितांना आदेश दिले की, पाच पोलिस अंमलदारांची तातडीने पोलिस नियंत्रण कक्षात उचलबांगडी करा. एवढ्यावरच पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे थांबले नाहीत तर जळगावला आल्यानंतर त्या पाचही पोलिसांना बोलावून त्यांची चौकशी करणार आहेत. त्या चौकशीत डॉ. मुंडेंना काही निष्पन्न झाले तर त्यांचेवर पुढीळ वेगळी कारवाई सुध्दा होऊ शकते. याचा अर्थ त्या पाच पोलिसांची फक्त पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात बदली झाली. एवढीच सजा त्यांना होईल असे नव्हे तर पोलिस अधीक्षकांना चौकशीतून काही आढळले तर त्यांचेवर दुसरी कारवाई सुध्दा होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही समारंभात पाहुणा म्हणून बोलवतांना दहावेळ विचार करून निमंत्रण द्यावे लागेल असे या घटनेवरून वाटते.

भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरींच्या उपस्थितीचे एवढे वावढे का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणे साहजिकच आहे. परंतु अनिल चौधरी हे एकदा गुन्हेगारी कृत्यामुळे जळगाव जिल्ह्यातून हद्दपार झाले होते. त्यांच्या हद्दपारीनंतर जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचेविरूध्द काही गुन्हे सुध्दा दाखल झालेले आहेत. खंडणीसारखा गुन्हा त्यांचेवर आहे. अशा पध्दतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीबरोबर पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांनी डान्स करणे यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होणे साहजिकच आहे. पोलिसांची सहानुभूती मिळवून असे गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं आपला स्वार्थ साधू शकतात हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. सहा महिन्यापूर्वी जळगाव शहरालगत  महामार्गावर एका धाबावजा हॉटेलमध्ये त्यांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी दांगडो केला होता. त्यामध्ये अनिल चौधरींच्या स्वीय सहाय्यकांनी एकाच्या डोक्याला पिस्तुल लावलेली होती. हे प्रकरण सुध्दा फार गाजले होते. सार्वजनिक स्थळी पिस्तोलसारखे हत्यार दाखवून दहशत माजवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

अशाप्रकारे पोलिसांना हवा असलेला गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसांबरोबर डान्स केल्याने खरोखरच पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. या म्हणण्याला अर्थ आहे. पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडेंनी तातडीने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन. कारण पोलिसांनी डॉन्स केल्याने आमचे पोलिस खात्याशी जवळचे संबंध आहेत हे दाखवून शेखी मिरवण्याचा प्रकार ते करताय. अनिल चौधरीसारखी माणसं सामाजिक कार्य करण्यात आपण अग्रेसर आहोत असे भासवतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनिल चौधरींनी भाजपशी बंडखोरी करून रावेर मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आता मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. इतकेच नव्हे तर नाशिक विभागीय अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळत आहेत. बच्चू कडू आणि अनिल चौधरी यांचे वैचारिक संबंध कसे मॅच होतील हे येता काळच ठरवेल. परंतु आज मात्र लोक प्रतिनिधी अनिल चौधरींची समारंभातील उपस्थिती आणि त्यांचे समवेत पोलिसांनी केलेल्या डान्समुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली म्हणून  पाच पोलिसांवर कारवाई झाली एवढे मात्र निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here