अनिल अंबानींची ३ हजार कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; पुणे, ठाण्यातील संपत्तीचाही समावेश
नवी दिल्ली – रिलायन्स समूहाचे (अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप) अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित तब्बल तीन हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) करण्यात आलेल्या या कारवाईत मुंबईतील पाली हिल येथील अंबानी कुटुंबाचे आलिशान घर, तसेच समूह कंपन्यांच्या मालकीच्या पुणे, ठाणे आणि इतर ठिकाणच्या निवासी व व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली.
ईडीने ३१ ऑक्टोबर रोजी चार तात्पुरते आदेश जारी करून एकूण ४२ मालमत्तांच्या जप्तीची कार्यवाही केली. या सर्व मालमत्ता अंबानी यांच्या वैयक्तिक तसेच समूहाशी संबंधित विविध कंपन्या आणि संस्थांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित वित्तीय गैरव्यवहार आणि परदेशी व्यवहारांच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या जप्तीत समाविष्ट असलेल्या मालमत्तांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे ईडीच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे अनिल अंबानी समूहावर पुन्हा एकदा आर्थिक अनियमिततेचे वादळ निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत या चौकशीला अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.