अनंत कीर्ती नामे । अनंतासी अनंत तो एक हरि ॥
शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांचा पंचरत्न हरिपाठातील हा अभंग ….! भगवंत काय असतो ? तो कसा आहे ? सगुण निर्गुणाच्याही पलिकडे असलेला हा परमात्मा कळला, वळला, आकळला तो फक्त संतांना …..! कलीयुगात मानव बुध्दीप्राविण्याने व तर्कसंगत विवेक-अविवेक या ३६ गुणांनी युक्त आहे. गत ५० वर्षांपूर्वी लग्न साखरपुढा, वाड: निश्चय, रुपयानारळ, मुखदर्शन आदि विधी पार पाडतांना साधेपण, पैशांची बचत, वेळ व कमी गर्दीचे व्यवस्था पण निर्वीघ्न पार पडत होते.
या सर्व सोपस्कारांमधून ज्यांच लग्न आहे त्या वधु-वरांना एकमेकांचा परिचय व्हावा (मर्यादा राखून) एकमेकांनी समजून घ्यावं काही सिमेपर्यंत नवरा- नवरी यातील मान- पान त्यांच्यातील स्वभाव वैशिष्ट्ये जाणुन घेऊन मग त्या घरात आपली मुलगी सुखात नांदू शकेल अशी पक्की खात्री करुन घेत संबंध वाढीस लागायचे प्रस्थापीत व्हायचे ….! अलिकडे ‘चट मंगणी पट ब्याह’ ही प्रवृत्ती बळावत चालली आहे. नवरा मुलगा सोडला तर वधू, माता, पिता यांनी घर-दार घराणे, तिथली माणसं, व्यवसाय, काम-धंदा याची खातरजमा ओळख न करुन घेता मुलगी-मुलगा यांच्या होकारावर लग्न जुळतात ?आणि मोबाईलवर बोलण्यामुळे ती सहज तुटतातही ‘तुला तुझ्या मित्रांचा का फोन येतेा ? तू व्हॉटसअपॅ वर त्याला का चॅट करते ? एवढया किरकोळ बाबींवर लग्न, साखरपुडे, रुपया नारळ मोडतात.
या सर्व घटना घडामोडींचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे न ओळखणे, पारखून न घेणे ? संत महंत परमहंस यांनी देवाला ओळखले, पारखले म्हणून आयुष्यभर त्यांच्याशी तादात्म्य पावून आपली जीवननौका व्यवस्थितपणे किनाऱ्यावर लावली. तो अनंत कोटी ब्रम्हांडनायक आहे, अनंत आहे, अविनाशी आहे म्हणून संतानी उत्कट भाव साधून भगवंताशी संगत केली तो देखील भक्तांशी तसाच एकरुप झाला. सुदाम्याच्या मुठभर पोहयांनी तो तृप्त होतो. जनाबाईला दळण दळू लागतो, निळोबाच्या बायकोचं बाळंतपण करतो, तुकोबांच्या जिजाईला काटा मोडला तो भगवंताने आपल्या दाताने काढला. किती कामे करावी भगवंताने म्हणून भक्त असो वा देव दोघांची पारख ओळख व्हायला हवी.
शंभर वर्षाचे सोडून द्या. ८० वर्षाचे आयुष्य जो आपल्या सहधर्मचारिणीशी कंठणार आहे त्यांची ओळख इतकी झटपट कशी ? प्रेम न करता तातडीने विवाह ? एकमेकांना समजून न घेता किरकोळ कारणांनी मग फारकत ? असे यक्षप्रश्न उभे राहिले की, घर ५ मजली असो वा ६ मजली ते कोसळते.. तिथली माणसं अविचलीत होतात.. संवाद तुटतो.. पश्चातापाने दग्ध झालेली म्हणतात तशी काही आत्महत्येच्या वाटेकडे जातात ? म्हणून संसारी मानसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे. मानसाचे चारित्र्य, चरित्र खूप जवळून पारखले पाहिजे. भगवंताने राधेचं प्रेम पारखून घेतलं म्हणून ती अष्टनायिकांपेक्षाही श्रेष्ठ ठरली.
जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥
वैकुंठ कैलासी तिर्थक्षेत्री देव । तयावीण ठाव रिता कोठे ॥
वैष्णवांचे गुहय मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ॥
एकाकार झाले जीव शिव दोन्ही ।एका जनार्दनी एैसे केले ॥
मिराबाईने विषाचा प्याला पिऊनही भगवंताप्रती भक्तीत तल्लीत राहिली. या अनंत शक्तीत जे जे दृष्टीस दिसते ते हरिरुप आहे. त्याची पूजा, अर्चा, जप, तप करावे लागत नाही. वैकुंठ, कैलास ही देवांची स्थाने आहेत. तो आपल्याकडे आल्यावर का ही ठिकाणेी ओस पडली असे होत नाही. जीव- शिव यांचे मिलन होणे म्हणजे, आत्मा- परमात्मा भेट झाली असे जनार्दन स्वामींना स्मरुण एकनाथ महाराजांनी म्हटले आहे.
रमेश जे. पाटील
आडगाव ता. चोपडा
मो. 9850986100