भुसावळ :- हिमालय व इतर थंड प्रदेशात हाडे ठीसुर करणाऱ्या -३० डिग्री तापमानात भारतीय सैन्य काम करते, उबदार राहण्यासाठी इलेक्ट्रिक हीटर, केरोसीन व लाकूड जाळले जाते. यामध्ये खर्च जास्त पण ऊर्जा कमी मिळते तसेच प्रदूषण वाढते.
थंडीमध्ये गरम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करून स्थानिक तापमानाच्या २० डिग्री पर्यंत नियंत्रित राहू शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन भारतीय लष्कराला हिमालयीन व थंड प्रदेशात वैज्ञानिकांनी सोलर पॉवर मड हाऊस बनवले आहे, त्याच धरतीवर भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल यांच्या संकल्पनेतून श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या शुभम नेमाडे, अजयराजे कडु पाटील, चेतन चौधरी, अजय पाटील, शुभम बारी, निकिता खोब्रागडे, देविश्री सोनवणे, सायली चौधरी, प्रतिष्ठा श्रीवास्तव, दिव्या शर्मा यांनी थंडीमध्ये गरम व उन्हाळ्यात तापणाम नियंत्रित राहील अश्या घरांची निर्मिती केली आहे.
या घराची दक्षिण बाजू सिमेंट काँक्रीट भिंत व काचेने विस्तारलेली आहे. दक्षिण बाजूला असल्याने जास्तीत जास्त सूर्यप्रकाश त्यावर पडतो आणि आतील भाग गरम राहण्यास मदत होते. इतर बाजूच्या भिंती स्ट्रॉ फायबर, फाईन क्ले, वेस्ट मटेरियल आणि पाण्याच्या समांतर मिश्रणातुन बनल्या असून बाहेरील तापमानाचा आतल्या तापमानावर फरक पडू देत नाही. काँक्रीट भिंत फक्त हिवाळ्यात काचेच्या मदतीने सूर्य प्रकाश ग्रहण करते, उन्हाळ्यात सूर्य किरणे परावर्तित करतात.
भुसावळ सारख्या अति उष्ण भागात या घरात थोडा बदल केला असून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी तापमान मोजमाप करण्याचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र तापणाम नियंत्रित करण्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी उपयुक्त ठरते. इतर भागांच्या भिंती ह्या उष्णता रोधक असल्याने तापमान वाढत नाही.
सौर ऊर्जेवर आधारित घरात नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर केला आहे. कारण अश्या दुर्गम भागात वीज, डिझेल, केरोसीन, स्टील आणि लाकूड वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. वर्षाच्या जवळजवळ ३०० दिवसांसाठी उपलब्ध सूर्यप्रकाश वापरासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ज्यामुळे प्रदूषणावर सुद्धा मात करण्याचा प्रयत्न केला आहे. यात एक खिडकी असून ती एका कोपऱ्यात जोडलली आहे. हे जोरदार थंड हिवाळा थांबवते परंतु हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश आणि उष्णता परवानगी देते.
स्वस्त घरे सिव्हिल अभियंत्यांची देण:
गृहनिर्माण क्षेत्रात अश्या घरांची किंमत कमी आहे, प्री फॅब्रिकॅटेड घरे दोन हप्त्यात बनवणे शक्य आहे. तरुण सिव्हिल अभियंत्यांना व उद्योजकांना या क्षेत्रात काम करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या असून उष्ण प्रदेशात ही घरे उपयुक्त ठरतील असे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक डॉ.पंकज भंगाळे यांनी सांगितले.
प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न:
वैज्ञानिकांनी बनवलेल्या घरांची प्रतिकृती निर्माण करून भुसावळ सारख्या उष्ण भागात वातावरणाच्या बदलानुसार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागातील विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य दर्शवतो तसेच यात वापर केलेले नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र व्यवसाय स्थापन करण्याची संधी देत आहे असे विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. जे.टी. अग्रवाल, सचिव श्रीमती मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष ऍड. एम.डी.तिवारी, एस. आर. गोडयाले, पंकज संड, संजय नाहाटा, रमेश नागरणी व सर्व हिंदी सेवा मंडळ पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे यांनी अभिनंदन केले.