नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मूत्रसंसर्ग आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांना डायलेसिसवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
एम्स हॉस्पिटल प्रशासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी औषधोपचारांना प्रतिसाद देत आहेत. मात्र संपूर्ण उपचार होईपर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी देशभरात पूजा-प्रार्थना, हवन करण्यात येत आहेत.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी अटलबिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अंगात ताप नसून त्यांना डायलेसिसवर ठेवण्यात आले होते. वाजपेयी यांना रुटिन चेकअपसाठी दाखल केले असून रात्री घरी पाठवण्यात येईल, असे आधी सांगण्यात आले. मात्र नंतर त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांचे वय 93 असून, ते स्मृतिभ्रंश, मधुमेहामुळे अनेक वर्ष अंथरुणाला खिळून आहेत. ते सध्या कोणाला ओळखूही शकत नाहीत.