जळगाव | तालुक्यातील वडनगरी येथील एसटीचे सेवानिवृत्त चालक महारू किसन पाटील (वय ६०) या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाल्याची घटना ममुराबाद-जळगाव रस्त्यावर मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. धडक देणाऱ्या वाहनासह चालक फरार झाला आहे.
महारू पाटील हे मंगळवारी सायंकाळी उशिरा वडनगरी येथून जळगाव शहरात काहीतरी कामानिमित्त दुचाकीने गेले होते. ठरलेली कामे आटोपून ते ममुराबादमार्गे वडनगरीकडे दुचाकीने निघाले. मात्र, ममुराबाद गावापासून जवळच जोगेश्वरी मंदिरासमोर असलेल्या वळणावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. खाली रस्त्यावर पडून डोक्याला जोरात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ममुराबाद येथील वाहन चालकांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आधारकार्डवरून मृताची अोळखली पटवली. वडनगरी येथील पोलिस पाटील जितेंद्र पाटील हे मृताच्या नातेवाईकांसह लगेच हजर झाले होते.

