नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रतिनिधित्वाची धुरा पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली आहे. या नव्या मंत्रिमंडळात अनेक बदल करण्यात आले असून अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांना कायम ठेवण्यात आले असून त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. डोवाल यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
डोवाल यांनी मागील सरकारमध्येही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद सांभाळलं आहे. २०१४मध्ये केंद्र सरकारनं त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनिती आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. १९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोवाल यांनी ‘आयबी’मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे. ‘आयबी’चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सहा वर्षे वास्तव्य केलं आहे. १९८८मध्ये त्यांना ‘किर्ती चक्र’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.