नवी दिल्ली :– आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात झालेल्या घसरणीचा भारताला लाभ झाला आहे. आठवड्याची अखेरही पेट्रोल व डिझेलच्या दरकपातीनेच झाली आहे. रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १६ पैशांनी तर, डिझेलचे दर प्रतिलिटर १५ पैशांनी कमी करण्यात आले. या कपातीनंतर मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ७६.२५ व ६७.६३ रुपये नोंदविण्यात आले. तर नवी दिल्लीत हे दर अनुक्रमे ७०.५६ व ६४.५ रुपयांपर्यंत खालावले.
ब्रेण्ट क्रूड ऑइलचे दर प्रतिबॅरल ६२ अमेरिकी डॉलरपर्यंत घसरले आहेत. यामुळे ३० मेनंतर इंधनाच्या दरांत सतत कपात केली जात आहे. गेले चार दिवस ही कपात अखंड होत असून या चार दिवसांत पेट्रोलचे दर ६७ पैशांनी तर डिझेलचे दर ९१ पैशांनी घटले आहेत.