अखेर लेंडी नाला वाहतुकीसाठी उद्यापासून होणार खुला

0

शिवाजीनगर वासियांना दिलासा : 

जळगाव – वाहतुकीस कोणताही पर्याय न देता शिवाजीनगरच्या रेल्वे उड्डाणपूलचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरु आहे.  पर्यायी रस्त्यासाठी शिवाजीनगर वासियांनी रेल्वे रोको आंदोलन केल्यानंतर तब्बल चार वेळा मुदतवाढ मिळालेल्या लेंडी नाल्याचे काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे २६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हा रस्ता खुला होणार आहे.

शिवाजीनगरला जोडण्यासाठी ब्रिटिशांकडून सुमारे दीडशे वर्षांपूर्वी शिवाजीनगरचा उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. या पुलाची कालमर्यादा संपुष्टात आलेली असल्याने नवीन पूल तयार करण्याचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना सुरत व असोदा रेल्वे गेटमार्गे ८ ते १० किलीमीटरच्या फेऱ्याने शहरात यावे लागत आहे. शनिपेठमार्गे जवळचा पर्यायी रस्ता आहे. परंतु या नाल्यावरील रेल्वेपुलाचे काम महापालिकेतर्फे सुरु असल्यामुळे नागरिकांना फेऱ्याने ये-जा करावी लागत आहे. आता रेल्वेपुलाखालील काम पूर्ण झाले असून या पुलाखालून मिनी बस, स्कूल बस, रुग्णवाहिका, दुचाकी, तीनचाकी असे वाहनांसाठी हा पूल शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून खुला होणार आहे. मात्र ट्रक, एस टी, डंपर या अवजड वाहनांची उंची जास्त असल्यामुळे या वाहनांना या ठिकाणाहून जाता येणे शक्य नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्यायी रस्त्यासाठी शिवाजीनगर वासियांनी रेल्वे रोको आंदोलन केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने १० एप्रिलपर्यंत लेंडी नाल्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या दिवसापासून काम पूर्ण न झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुन्हा आठवडाभाराची मुदत वाढवून दिली. त्यानंतरही हे काम पूर्ण करता न आल्याने रेल्वे प्रशासनाने पुन्हा चौथ्यांदा मुदत वाढवून देत २५ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार या कामाला विलंब होत असल्यामुळे शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपककुमार गुप्ता यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. यानंतर पंतप्रधान कार्यालयानेदेखील गुप्ता यांना पत्र पाठवून २५ एप्रिलपर्यंत लेंडी नाल्याचे काम पूर्ण होणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार प्रशासनाने लेंडी नाल्याचे काम अखेर पूर्ण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.