मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसें यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असं विधान केले होते. त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असं म्हटलं आहे. आता खडसे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागीतली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असंही खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2020
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असंही दवेंनी म्हटलं आहे. त्याचसोबतच दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, हे एकनाथ खडसेंना ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटतं, एकनाथ खडसेंनी आपलं विधान मागे घ्यावं नाहीतर पुण्यात आल्यानंतर खडसेंना जाब विचारण्यात येईल. यासंदर्भात आनंद दवेंनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदनही दिलं आहे.
ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. ”दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”, असे खडसेंनी म्हटलंय.