अखेर खडसेंनी सोडले मौन ; फडणवीसांना म्हणाले ”ड्रायक्लीनर”

0

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी अखेर मौन सोडत थेट पहिल्यादाच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना ड्रायक्लीनर असं संबोधलं आहे. खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट देवेंद्र फडणवीस यांनाच काही सवाल केले आहेत.

“पक्षाकडे मी वारंवार हे सांगितलं आहे. ज्यांनी हे केलंय, त्यांच्याकडून याची उत्तर घ्या. ज्यांनी अशा स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप केले. ज्यांनी तिकीट देण्यामध्ये अडथळे निर्माण केले. ज्यांनी तिकीट देऊन हरवण्याचा प्रयत्न केला. याचे सारे पुरावे दिले आहेत. तर सहा महिने झाले निवडणूक होऊन पक्ष त्यावर कार्यवाही का करत नाही. निदान आम्हाला बोलून तरी विचारा. मी पुरावे दिले आहेत. व्हिडीओ कॅसेट दिल्या आहेत. रेकॉर्डिंग दिलं आहे. वर्तमानपत्राची कात्रण दिली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याचं मान्य केलं होतं. मग कारवाई करायला विलंब का होतोय. माझ राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का?, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असं विचारलं पाहिजे. खरं असेल तर करा,” असं खडसे यांनी म्हणाले.

“देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. जो आला त्याला क्लीनचीट दिली. आमचा ड्रायक्लिनरच होता. त्याच्यामध्ये असं होतं की, जो कुणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेचच क्लीनचीट मिळायची. फक्त मी आलो आणि ते क्लीनचीट देऊ शकले नाहीत. म्हणजे आमच्या ड्रायक्लीनरकडे पण अशी काय कला होती, इतक्या लोकांना दिली पण मला देऊ शकले नाही. याच कारण काय?, हे विचारण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे मी ते विचारतोय,” असं म्हणत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.