अखेर आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नातून प्रलंबित घरकुल लाभार्थ्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात
नागरिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा
बोदवड (प्रतिनिधी) :- शहरातील गट नं ५७९/२ व ५८०/२ यामधील प्रभाग क्रं.१६,१७,आणि ८ मध्ये येत असलेल्या स्वामी विवेकानंद नगर,बजरंग पुरा,मण्यार वाडा येथील रहिवासी यांना घरकुल लाभ घेण्यासाठी मोजणी सीट किंवा सीटी सर्वेचा उतारा आवश्यक असल्याने व त्यांना तो मिळत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून येथील लाभार्थी घरकुल लाभाच्या प्रतिक्षेत होते.
अखेर आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून व येथील रहिवासी शांताराम रामकृष्ण कोळी यांच्या समवेत असलेल्या ४४४ अर्जदाराच्या पाठपुराव्याला यश आले भुमी अभिलेख कार्यालयाकडून शहरातील स्वामी विवेकानंद नगर,बजरंग पुरा,मण्यार वाडा येथील ३६ घरकुल लाभार्थ्यांच्या घरांच्या जागेच्या मोजणीला सुरुवात झाली आहे.
नगर पंचायत माध्यमातून घरकुल लाभ व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्या करीता संबंधित कागदपत्रांनी कायम आवश्यकता भासत असते.त्यामुळे ही आवश्यक कागदपत्रे संबंधित रहिवासी यांच्याकडे नसल्याने गेल्या दिड वर्षांपासून ते घरकुल लाभ व इतर शासकीय योजनांपासून वंचित होते.
याबाबत येथील शांताराम कोळी व येथील ४४४ अर्जदारांनी याबाबत वारंवार पाठपुरावा करून आंदोलन करीत संबंधित समस्या आ.पाटील यांच्याकडे मांडली.याची दखल घेत आ.पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना करीत सदरचा प्रश्न मार्गी लावला. गेल्या दिड वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावल्याबद्दल आ.पाटील याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.