अक्षयतृतीया घरोघरी उत्साहात साजरी : बाजारपेठेत करोडोंची उलाढाल

0

भुसावळ :– घागर भरून ,पितरांचे पूजन करून,आंब्याचा रस पुरणपोळी व मिष्टानांवर ताव मारत ,माहेरवाशीणींनी झोक्याचा आनंद घेत घरोघरी  आखाजी अर्थात अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मोठ्या  उत्साहाने साजरा करण्यात आला. अक्षयतृतीयेला खरेदी केलेल्या वस्तुंना अक्षय प्राप्त होते. धन धान्य संपत्ती मध्ये वृद्धी होते म्हणून विष्णूची पूजा करण्यात येते. याअनुषघाने अनेकांनी सोनं, वाहन ,धान्य आदी खरेदी केली. मंगळवारी येथील बाजारपेठ बंद असते मात्र अक्षतृतीयेकरिता बाजारपेठ सुरू होती. चक्क सराफबाजार सुद्धा सुरू होता. दुकानांवर सुवर्ण अलंकार खरेदी करीता व वाहन खरेदी करता ग्राहकांची गर्दी झाली होती. आखाजीचे निमित्ताने बाजारपेठेत  190 मोटारसायकल विक्री होऊन सुमारे एक कोटींची उलाढाल झाली तर सुवर्ण अलंकार विक्रिनेही उच्चांक गाठला. तसेच नवनवीन कपडे खरेदी करिता सुद्धा दुकानांवर ग्राहकांची झुंबड होती.

अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून काही विवाह सोहळे झाले तर काही नी गृहप्रवेश केला .व्यापा-यांनी नवीन दुकाने थाटली. अक्षय्यतृतीयेच्या खरेदी सोबतच मंगळवारी घरोघरी पितरांचे पूजन करण्यात आले. खान्देशात आखाजी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या सणाला घागर भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वत्र घागर भरून पितरांचे स्मरण करण्यात आले. यासाठी आंब्यासह खरबूज, केळीचे पाने यांच्यासह पूजा साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले. यात खरबूज व आंब्याचे महत्व असल्याने त्यांचे  भाव तर चांगलेच वधारले होते. ६० ते ७० रुपये प्रती किलोवर खरबूजचे भाव पोहचले होते. यात एक फळ घ्यायचे झाल्यास किमान ९० ते १०० रुपये मोजावे लागत होते.

केळीच्या पानांचाही मोठा तुटवडा जाणवला. मंगळवारी चार ते पाच पाने १० रुपयांना विक्री होत होते.या सर्व वस्तूंची खरेदी झाल्यानंतर घरोघरी पूरणपोळी, आमरस, कुरडई-पापड, भजी, सांजोरी असा स्वयंपाक होऊन घागर भरुन पितरांना या सर्व मिष्टान्नांचा नेवैद्य दाखविण्यात आला. घागर, त्यावर खरबूज, कुरडई, सांजोरी ठेवून  या प्रथेची माहिती भावी पिढीला देण्यात आली. ग्रामीण भागात अजूनही काही झाडे आहेत मात्र शहरात हे चित्र दुर्मिळ झाले आहे तरीही अनेक ठिकाणी माहेरी आलेल्या मुलींसह महिलांनी अंगणात व घरात झोके बांधून पारंपारिक गाणी म्हणून  झोक्याचा आनंद लुटला.

Leave A Reply

Your email address will not be published.