अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची आकडेवारी जाहीर केली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालय अलॉट करण्यात आलेली संख्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

 

मुंबई विभाग

मुंबई महानगर विकास प्राधिकरणात येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची क्षमता 1 लाख 97 हजार 171 इतकी असून त्यासाठी 1 लाख 91 हजार 093 विद्यार्थ्यांनी नोदंणी केली होती. त्यापैकी 1 लाख 17 हजार 883 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

अमरावती विभाग

अमरावती विभागाची प्रवेश क्षमता 11339 इतकी असून त्यापैकी 7 हजार 408 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. पहिल्या यादीत 5533 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

नागपूर विभाग

राज्याची राजधानी नागपूर विभागातील प्रवेशाची क्षमता 42 हजार 883 असून त्यासाठी 17 हजार 944 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 14 हजार 245 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

नाशिक विभाग

अकरावी प्रवेशसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रवेश क्षमता 20 हजार 921 इतकी आहे. तर, 16 हजार 208 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 11 हजार 850 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलेलं आहे.

पुणे विभाग

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची अकरावी प्रवेशाची क्षमता 86 हजार 482 आहे. त्यासाठी 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

असे तपासा.. महाविद्यालय अलॉट झालं का..

  • अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.
  • नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा.
  • लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल.
  • वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा.
  • तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल.

शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशा विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केलं आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.