रावेर:- माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपा पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात वारंवार गैरहजर राहणार्या आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयाने सांताक्रुझ पोलिसांना दमानिया यांना अटक करण्याबाबत वॉरंट बजावले होते.त्यानुसार आज अंजली दमानिया कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांना न्यायालयाने पीआर बॉन्डवर त्यांची सुटका केली .
सोमवारी दमानिया न्यायालयात हजर झाल्या व स्वतः त्यांनी आपली बाजू न्या.डी.जी.मालवीय यांच्याकडे मांडली. यावेळी तक्रारकर्त्यांचे वकील अॅड.चंद्रजीत पाटील यांनी दमानिया या प्रत्येक वेळी न्यायालयात हजर राहत नाही त्यामुळे त्यांना पीआर बॉण्डवर सोडू नये, अशी बाजू मांडत वॉरंट कॅन्सल करू नये, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने दोघा बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर दमानिया यांना 300 रुपये दंड सुनावला व 15 हजारांच्या पीआर बॉण्डवर त्यांची सुटका केली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे व छगन भुजबळ यांच्यातील संबंध तीन ते चार दिवसात जाहीर करून खळबळ उडवून देणार असल्याचा गौप्यस्फोट आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलताना केला .
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि , माझ्याविरुद्ध 22 ठिकाणी बदनामी प्रकरणी खटले दाखल करण्यात आले. आपल्याला केवळ मानसिक त्रास व्हावा हा त्यामागील उद्देश होता . मात्र खडसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे खटले दाखल केले मात्र एकही खटला त्यांनी दाखल केला नाही . कारण तसे झाले असतेतर मी त्यांना जेरीस आणले असते, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान माजी मंत्री खडसे व छगन भुजबळ यांच्यातील संबंध आपण तीन ते चार दिवसात जाहीर करणार असल्याचे सुतोवाच दमानिया यांनी येथे केले. खडसेंनी आपल्याविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी केली आहे मात्र सीबीआयच काय यापेक्षा मोठी चौकशी होईल व खडसें यांना भोगावेच लागेल, असेही दमानिया म्हणाल्या.