सोमवार ठरला जळगावसाठी घातवार

0

विविध अपघातात पाच जण ठार !

जळगाव : जळगाव जिल्ह्यासाठी सोमवार हा घातवार ठरला आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहे. यात कुसूंबा (ता. जळगाव), कुऱ्हापानाचे, नशिराबाद, यावल, विदगाव येथे सदर अपघात झाल्याच्या घटना झाल्या. त्यातच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाहनाला मद्यधुंद कारचालकाने मागून धडक दिली. यामध्ये डॉ. उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील आणि वाहनचालक जखमी झाले आहेत.

सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हिंगोणा गावाजवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अल्लाउद्दीन मुबारक तडवी (फैजपूर) व पंखा पवार (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात मयतांविरुद्ध मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंखा पवार हे प्लॅटीना (एम.एच.19 ई.ई.9787) वरून हितेश दारासिंग पवार (हलखेडा) यांच्यासोबत जात होते. या दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणारी विना क्रमांकाच्या हिरो होंडावरून अल्लाउद्दीन मुबारक तडवी (फैजपूर) व नबाब मुराद तडवी (फैजपूर) व शरीफ लतीफ तडवी (फैजपूर) हे ट्रीपल सीट जात होते. दोन्ही भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्याने अलाउद्दीन तडवी व पंखा पवार यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. अपघातप्रकरणी हिंगोणा पोलिस पाटील दिनेश बाविस्कर यांनी फैजपूर पोलिसात फिर्याद दिल्यावरून दोघाही मयत दुचाकीस्वारांविरुद्ध मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत.

वडिलांसाठी औषधी घेण्यासाठी जाणारा मुलगाच गेला

वडीलांसाठी औषधी घेण्यासाठी विरवाडा (ता. चोपडा) येथील महेश दीपक म्हाळके (वय 22) हा वडीलांची औषधी घेण्यासाठी दुचाकीवरून (क्र.एम.एच. 19, सीएल 2297) मित्र चेतनसोबत जळगावी येत होता. परंतु चोपडा- विदगाव मार्गावर देवगावजवळील चेरी फॅक्‍टरीच्या समोर तोंडाला रूमाल बांधण्यासाठी गाडी उभी केली होती. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एम.एच. 19, सीएफ 4870) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात महेश हा चाळीस फुट लांब फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाला डंपरने उडवले

कामावरून रिक्षाने घरी जात असताना रिक्षाजवळ उभे असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मुत्यु झाला. ही घटना कुसुंबा येथे घडली आहे. या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला असून डंपर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ईश्वर रतन मिस्तरी (वय-35) रा. कुसुंबा हे गवंडीचे काम करतात तसेच काही वेळा चटईच्या फॅक्टरीत काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी चटई कंपनीतून काम करून रिक्षाने कुसुंबा गावातील देवा सायकल मार्ट समोर उतरले. त्याचवेळी मागून येणाऱ्या वाळूने भरलेले डंपर क्रमांक (एमएच 19 झेड 7557)ने जोरदार धडक दिली. या धडकेत ईश्वर मिस्तरी यांचा जागीच मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.