संतवचनं तुकाराम महाराजांची पण कृती मात्र मंबाजीसारखी ; शिवसेनेची भाजवर टीका

0

मुंबई : सत्यमेव जयते व प्राण जाय पर वचन न जाय हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून मळमळ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, अशी टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे. संतवचनं तुकाराम महाराजांची पण कृती मात्र मंबाजीसारखी असे म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

आमदार निवडून येऊनही भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते व त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करीत आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला आहे. सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. लोकशाही परंपरेत विरोधी पक्षाला झुकते माप मिळायला हवे, पण झुकते माप म्हणजे फक्त मळमळ ओकणे व तंगड्या झाडणे नव्हे.

विरोधी पक्षनेते फडणवीस हे सभागृहात नको तितक्‍या तावातावाने बोलतात, पण त्यांचे बोलणे बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झाले आहे. राज्यातले सरकार बहुमताचे आहे व विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी ठाकरे सरकारवर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षापुढे आरसा ठेवला आहे. सरकार शब्दाला पक्के नाही आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, असं फडणवीस बोलतात. मोदी यांच्या सरकारने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करुच हे वचन पाळलं असतं, तर शेतकरी खुश झाला असता आणि परस्पर कर्जमुक्तीही झाली असती. फसवणुकीचे प्रयोग भाजप सरकारने सुरु केले आहेत. आधी स्वतः दिलेली वचने पाळा. मग संतवचनांची उधळण करा, असंही ‘सामना’तून सुनावण्यात आलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.