शिवसेनेची पंजाबच्या राजकारणात एंट्री? काँग्रेसच्या अडचणी वाढणार

0

चंदिगढ, लोकशाही न्यूज नेटवर्क  

राज्यात सत्तेत असलेली शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोव्यात पुढील वर्षी होणारी निवडणूक लढणार आहे. पंजाबमध्ये पुढल्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंजाबबद्दल अद्याप शिवसेनेनं कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीही पंजाबमध्ये शिवसेनेची चर्चा आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये शिवसेना काँग्रेसच्या अडचणी वाढवताना दिसत आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडला. आता ते नवा पक्ष स्थापन करून भाजपसोबत सशर्त आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. त्यावरून त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरिश रावत यांनी सिंग यांना धर्मनिरपेक्षतेची आठवण करून दिली. त्यावरून सिंग यांनी रावत यांना प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेसोबतची आघाडी कशी चालते, असा सवाल सिंग यांनी विचारला आहे.

भाजपमधून येणाऱ्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेता, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते, असा थेट प्रश्न कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केला आहे. सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. ‘हरिथ रावतजी, धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलणं बंद करा. नवज्योतसिंग सिद्धू १४ वर्षे भाजपमध्ये होते. तिथूनच ते काँग्रेसमध्ये आले ही बाब विसरू नका. नाना पटोले, रेवांथ रेड्डी कुठून आले?’ असा सवाल कॅप्टन अमरिंदर यांच्याकडून विचारण्यात आला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवरूनही काँग्रेसला लक्ष्य केलं. ‘तुम्ही महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काय करताय? काँग्रेसला अनुकूल असेल तेव्हा धर्माच्या आधारे राजकारण करणं योग्य असतं का? याला संधीसाधू राजकारण म्हणत नाहीत का?’, अशा प्रश्नांची सरबत्ती माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.