महाडमध्ये अतिमुसळधार पावसाने दरड कोसळून ७२ जण बेपत्ता

0

महाड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अतिमुसळधार पावसाने महाड तालुक्यातील बीरवाडीजवळ  दरड कोसळल्याने  ३० घरांमधील ७२ लोक दाबले गेल्याची भिती व्यक्त होत आहे.

कोकणच्या किनारपट्टीला तुफानी पावसाचा तडाखा पडल्याने अनेक ठिकाणी प्रचंड पूर आल्याचे दिसून येत आहे. यात चिपळूण शहरात सर्वात भयंकर स्थिती आहे. तर आता इतर ठिकाणी देखील अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. यातच रायगडमधील महाड तालुक्यातील तलीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील जवळपास ३० घरांवर दरड कोसळून मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७२ रहिवासी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावाकडे जाणारा रस्ता खचल्यानं अद्याप मदत पोहोचू शकलेली नाही. मात्र यात मोठी जीवीत हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चिपळूणमध्ये पाऊस सुरूच असल्याने येथील स्थिती बिघडली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाड आणि माणगाव तालुक्यात आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे. यातच आता दरड कोसळल्याच्या घटनेने प्रशासनाची चिंता वाढविली आहे.

दरम्यान बिरवाडीपासून 14 km अतंरावर दरड कोसळल्यामुळे या दुर्घटनाग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर धावले आहेत. “तळईपासून अर्धा तासाच्या अंतरावर मी, गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे अडकून पडलो आहोत. तळईचे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी माहिती दिली आहे की, गावात 25 ते 30 घरं दरड कोसळून त्याखाली आलेली आहेत. यात कुणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळालेली नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी जवळच्या बिरवाडी पोलीस स्टेशनवरुन अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. उपजिल्हाधिकारीही जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही एका ठिकाणी थांबलो आहोत. पाणी ओसरलं नाही तर एनडीआरएफच्या बोटीतून पुढे दासगावला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून बिस्किट, चटई आणि पांघरुन देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.