प्रदीप पवारांसमोर जिल्ह्यात काटेरी वाढ!

0

जळगाव जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पवार यांचा आज पदग्रहण सोहळा पार पडला. गेले साडेसात वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून चोपडा येथील ॲड. संदिपभैय्या पाटील यांनी कामगिरी पार पाडली. जिल्ह्यात एकही काँग्रेसचा आमदार – खासदार आणि जि.प., पं.स. तसेच नगरपालिकात काँग्रेसचे वर्चस्व नव्हते. जिल्ह्यातील काँग्रेसला पूर्ण घरघर लागली होती. तथापि, ॲड. संदिप पाटलांचा शांत स्वभाव, सर्वांना समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे जिल्ह्यात 2019 च्या निवडणुकीत रावेर मतदार संघातून शिरीष चौधरी हे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघ 2019 साली काँग्रेसकडे खेचून घेतला.

मोदी लाटेमुळे आणि ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे डॉ. उल्हास पाटलांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मते लक्ष्यवेधी होती. हे विसरून चालणार नाही. जि.प. केवळ चार जागा असतांना एक सभापतीपद काँग्रेसला मिळवून घेण्यात यश आले होते. परंतु साडेसात वर्षे जिल्हाध्यक्षपदी राहिल्यानंतर त्या जागी दुसऱ्यांना संधी देण्यात यावी म्हणून स्वत: ॲड. संदिप पाटलांनी पक्षांकडे मागणी केल्यामुळे नवीन अध्यक्ष निवडण्यात आला.

भडगावचे रहिवासी प्रदिप पवार यांना ही संधी लाभली. वास्तविक नवीन युवा चेहऱ्याला संधी मिळाली असली तर बरे झाले असते, परंतु काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच जास्त असल्याने काँग्रेसचा वारसा असलेले तसेच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या प्रदिप पवार यांच्या गळ्यात जिल्हा अध्यक्षपदी माळ घातली गेली असावी हे स्पष्ट दिसून येते. ॲड. संदीप पाटील आणि प्रदीप पवार यांच्यामध्ये एक साम्य म्हणजे दोघेही काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत. दोघांच्याही घरी कॉग्रेसचा वारसा आहे. दोघांचेही वडील काँग्रेसचे आमदार होते. ॲड. संदिप भय्यांच्या मातोश्री मंत्रीसुध्दा होत्या. प्रदीप पवारांचे वडील जि. प. अध्यक्षसुध्दा होते. त्यामुळे काँग्रेसच्ाा वारसा प्रदिप पवारांकडे असला तरी गेल्या 20 वर्षापासून काँग्रेस संघटनेत जिल्ह्यात अथवा राज्यात विशेष अशी कामगिरी दिसून येत नाही.

भडगाव- पारोळा विधानसभा मतदार संघातून ते अपक्ष लढले. तेव्हा त्यांना 36 हजार मते मिळाली होती. परंतु पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर 2014 मध्ये पाचोरा- भडगाव मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली. परंतु त्यांना अवघी 2600 मते मिळाली. त्यांचे डिपॉझीटही जप्त झाले होते.

तरीसुध्दा प्रदिप पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही. काँग्रेसवरील त्यांची निष्ठा कायम होती. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

केवळ काँग्रेस निष्ठा हे निकष लावून प्रदिप पवारांना जिल्हाध्यक्ष केले असले तर जिल्ह्यातील संघटन बांधण्यात, जिल्ह्यात काँग्रेसचे जाळे मजबूत करणे यात ते कितपत यशस्वी होतात यावरच त्यांची निवड सार्थ झाली असे म्हणता येईल. एक पंचायत समिती सभापतीपद वगळता प्रदिप पवारांना कोठे यश आलेले नाही. दहा वर्षापूर्वी भडगावला झालेल्या नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे काही ही वर्चस्व दिसून आले नाही. ते स्वतः नगरसेवकपदाची निवडणूक हरले आहेत. त्यानंतर गेल्या दहा वर्षात भडगाव नगरपालिकेत काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांचेच वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे खिळखिळे झालेले संघटन मजबूत करण्यासाठी प्रदिप पवारांना फार मोठी मेहनत करावी लागणार आहे.

जिल्ह्यात त्यांचेसाठी अथवा काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी काटेरी वाट आहे. या काटेरी वाटेवरून चालण्यासाठी पायाच्या पायघड्या मजबूत होणे आवश्यक आहे. प्रदिप पवार यांच्या जमेच्या बाजूचा विचार केला तर ते निष्ठावान काँग्रेसी आहेत. त्यांना काँग्रेसचा वारसा आहे ते सुशिक्षित आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व बहारदार आहे. त्यांना भाषणाची कला अवगत आहे. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची मर्जी संपादन करण्यात ते वाकबगार आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजूबरोबर त्यांचा मायनस पॉर्इंटचा विचार केला तर ते सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर एकरूप होणे जमेल की नाही यांची शंका व्यक्त केली जाते. कारण व्हाईट कॉलर म्हणून त्यांचेकडे बोट दाखवण्यात येते गेल्या 20 वर्षांमध्ये काँग्रेसतर्फे झालेल्या आंदोलनात त्यांचा विशेष सहभाग दिसून आला नाही. त्यांच बरोबर संघटना लोकप्रिय होण्यासाठी गोर- गरीब व गरजूंच्या प्रश्नांवर लढा दिला पाहिजे अथवा त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला पाहिजे ते त्यांच्यात दिसून आले नाही.

जिल्ह्यातील तालुकानिहाय संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाभ्रंमती आवश्यक आहे. काँग्रेसचे एक निष्ठावान येणे म्हणून जिल्हाभरात  त्यांचा वावर दिसून आला नाही. या मायनस पॉर्इंटचा त्यांनी विचार करून त्यांच्यात प्रदिप पवारांना सुधारणा करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आगामी वर्ष म्हणजे निवडणुकांचे वर्ष आहे. जिल्हा बँक निवडणूकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा प्रयत्न झाला पाहिजे. त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. बाजार समित्यांच्या निवडणूका जाहीर झाल्याच आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याचे प्रदिप पवारांसमोर मोठे आव्हान आहे. त्यावरच त्यांच्या अध्यक्षपदाचे यश अपयश अवलंबून राहणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.