नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील नाईक नगर येथील एका ३४ वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे हातात अपेक्षित उत्पन्न न आल्याने व यातूनच संसाराचा गाडा ओढतांना डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेल्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील नाईक नगर येथे दोन एकर शेतजमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी अनिल शिवदास चव्हाण (वय ३४) यांच्या शेतातील पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे हाती न आल्याने तसेच आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख रुपये, महिंद्रा फायनान्सचे दिड लाख रुपये व खाजगी सावकारांचे दोन लाख रुपये कर्ज देणे होते.

डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व अतिवृष्टीने हातात आलेले पीक नष्ट झाल्याने संसाराचा गाडा ओढणे मुश्कील झाल्याने हतबल होऊन दि. १५ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी स्व:ताच्या  शेतात विषारी पदार्थ सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली. अनिल चव्हाण यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

सदर  शेतकऱ्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आज उघड्यावर आला आहे. तरी शासनाने योग्य ती मदत करावी अशी मागणी नाईकनगर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.