कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज रात्री करणार मोठी घोषणा?

0

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशातील  नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, यावेळी पंतप्रदान मोदी हे एखादी मोठी घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार, याबाबत देशवासीयांमध्ये उत्सुकता आहे. पंतप्रधान कार्यालयाने यांसदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते कोरोना व्हायरस संबंधित मुद्दे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.’ सध्या देशांत कोरोना बाधितांची संख्या वाढून १७५  झाली आहे.  देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात ४८ कोरोना बाधित आहेत. तर महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही स्तुती केलीय. पटनायक यांनी परदेशातून परतणाऱ्यांच्या मदतीसाठी सरकारी पोर्टलवर आपल्या बहिणीच्या डिटेल्स रजिस्टर केल्या आहेत. ‘मुख्यमंत्री पटनायक यांनी सर्वोत्तम उदाहरण सादर केलंय. मी आशा करतो की बाकी लोकही नवीन बाबूंनी दाखवलेल्या मार्गावर चालतील. कोविड १९ पसरण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्वच योगदान देऊ शकतो’ असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.