अटलजींच्या विचारांची शिदोरी सर्वदूर पोहचवा: आ. निरंजन डावखरे

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आजकाल राजकारण्यांबद्दल कुणी चांगले बोलत नाहीत, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे पुर्वीचे नेते फारच वेगळे होते. तेव्हा अशा प्रतिभाशाली अटलजींच्या विचारांची शिदोरी विद्यार्थ्यानी स्वतः आचरणात आणुन सर्वदूर पोहचवावी असे आवाहन ठाणे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केले.

देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ठाणे पूर्व (कोपरी) येथे भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात आ. डावखरे बोलत होते.

भारतीय जनता पार्टी स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यावतीने “माझा प्रभाग, माझा परिवार” या संकल्पनेतुन स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ‘कोपरी मंडल अध्यक्ष नगरसेवक भरत चव्हाण, सरचिटणीस कैलास म्हात्रे, सिद्धेश पिंगुळकर, स्लम सेलच्या महिला अध्यक्ष उषाताई पाटील, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, मीरा सोमजी, शालू पारकर, सचिन कुटे, हरी जोशी, बंटी तेली, परीक्षक राजन धुरी, भारत शाळेचे प्रिन्सिपल भरत स्वरूपा आदिसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. निरंजन डावखरे यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. अवघ्या दोन मतांनी केंद्रातील सत्तेला पारखे झाले असतानाही अटलजीनी आपल्या तत्वांशी तेव्हा तडजोड केली नाही. त्यांचे कार्य भाजपचे सर्व कार्यकर्ते यापुढेही अबाधित ठेवत आहेत. अशा या नेत्याच्या विचारांची शिदोरी विद्यार्थ्यानी सोबत ठेवण्याबरोबरच इतरांपर्यतदेखील पोहचवावी असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी विद्यार्थ्याना केले.

त्याचबरोबर आपल्या नेत्याची जयंती अशा अनोख्या पद्धतीने साजरी करत आदरांजली वाहण्याच्या उपक्रमासाठी कृष्णा भुजबळ यांचे कौतुक केले. तसेच निबंध स्पर्धेसाठी सर्वतोपरी योगदान देणारे प्रिन्सिपल भरत स्वरूपा यांचाही यावेळी आ. निरंजन डावखरे यांनी यथोचित सन्मान केला.

दरम्यान, भारत इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित केलेल्या इयत्ता आठवी ते बारावी या वयोगटासाठी असलेल्या निबंध स्पर्धेसाठी एकूण ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात प्रथम पारितोषिक- (इयत्ता ८ वी) अथर्व अनिल जिवतोडे,  द्वितीय पारितोषिक – श्रेयस सुनील शिंदे ( इयत्ता ९ वी), तृतीय पारितोषिक  – निशांत संजय यादव ( इयत्ता १२ वी) यांना आ. निरंजन डावखरे यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.